नेवासा/प्रतिनिधी
एकीकडे जात, धर्म यावरून द्वेषाचा वनवा पेटवला जात असताना सौंदाळा (ता. नेवासा) गावाने जातमुक्त गाव संकल्पना मांडून प्रेमाचा ओलावा निर्माण केला आहे. ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. सौंदाळा गावाचा हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यामुळे हे गाव, गावचे नेतृत्व आणि गावचे नागरिक हे कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या या निर्णयाबद्दल गावचे सरपंच आणि सहकाऱ्यांचा आज शुक्रवार दि.१३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सौंदाळा येथे जाहीर सत्कार करणार आहोत, अशी माहिती भक्ती संगम समुहाचे संचालक ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
सौंदाळा गावाचे सरपंच शरद आरगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड बाबा आरगडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख ग्रामस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव कैकाडी, विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, जगद्गुरु तुकोबाराय गाथा प्रचारक ह. भ. प. भारत महाराज घोगरे गुरुजी, घेरडीकर वारकरी फडाचे प्रमुख ह.भ. प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. महात्मा फुले यांची पगडी आणि संविधान प्रास्ताविक असे सत्काराचे स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भक्ती संगम समुह आणि प्रागतिक संस्था, संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व संप्रदायातील वारकरी आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.


