Thursday, March 19, 2026

बेबीताई गायकवाड यांचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड यांना मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. त्यांच्या एकल महिला, वीरपत्नी आणि वंचित घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.

मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ सायं.५ वाजता चर्चगेट, मुंबई येथे सर सिताराम तथा लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते बेबीताई गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदेडकर, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मागील दोन वर्षांपासून शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना ५० टक्के शुल्क माफी देण्यात येत होती, मात्र आता ही सवलत १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणाकडे वळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थिनींसाठी निर्वाह भत्ता योजना सुरू करून त्यांच्या राहणीमानाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा गौरव करत महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “पुरस्कार हा थांबण्याचा टप्पा नसून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे,” असे सांगत त्यांनी बेबीताई गायकवाड यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला आणि त्यांच्या कार्याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड म्हणाल्या की, “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार माझा नसून गेली तेरा वर्षे मी वीरपत्नी व एकल महिलांसाठी केलेल्या कार्याचा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मिळालेला हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. त्यांच्या विचारांना साजेसं कार्य पुढेही करत राहीन.
त्यांनी शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
बेबीताई गायकवाड यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या समारंभात पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!