नेवासा
शेतीच्या मालाला डॉ.स्वामीनाथन यांच्या शिफारशी प्रमाणे भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यासाठी शेतकरी संरक्षण कायदयाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ.अशोकराव ढगे यांनी केले.
भेंडा येथील जिजामाता कला व शास्त्र महाविद्यालयाचे वतीने नजिक चिंचोली येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात “भारतीय शेतीची स्वातंत्र्योत्तर वाटचाल” या विषयावर डॉ. ढगे बोलत होते.प्रगतशील शेतकरी ईश्वर पाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गणेशानंद गिरी महाराज, भागचंद चावरे,शब्दगंधाचे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी, कृष्णा गायकवाड, खेडली काजळीच्या माजी सरपंच सौ.निर्मला ढगे, अर्णव मते,राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक संजय मेहेर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहिनी साठे, प्रा. अब्दुल शेख व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.ढगे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी शेतीकडे विशेष लक्ष दिले नव्हते. त्यामुळे शेतीची अवस्था अत्यंत दयनीय होती. भारत स्वतंत्र झाला तेव्हा १९४७ काळात अन्नधान्याचे उत्पादन अत्यंत तुटपुंजे पावणे पाच कोटी टन पर्यंत होते. तथापि त्यानंतर १९६६ साली भारतात हरितक्रांती झाली व १९७५ मध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. १९७७ वर्षात आपण सर्व जगाला आश्चर्यचकित केले कारण आपला अन्नधान्याचा बफर स्टॉक दोन कोटी टन एवढा होता आज आपल्या देशामध्ये १४७ कोटी लोकसंख्या असतानाही आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून काही शेतमालाचे निर्यात सुद्धा होते यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट केले, कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन केले, व त्या काळातील नेत्यांनी शेतीला पाठ बळ दिले तथापि आज शेतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून दररोज शेतकरी १५ ते २० आत्महत्या करत आहेत,हा देशाला कलंक आहे.यासाठी आपण राज्याचे अध्यक्ष अशोक सब्बन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ,”शेतकरी संरक्षण कायदा” मसुदा तयार करत आहोत.
कृषी उत्पादन वाढीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुधारित जातीचे बी बियाणे,जमिनीचे आरोग्य, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर त्याचप्रमाणे कीड आणि रोगांचा बंदोबस्त केल्यास भरघोस पिकांचे उत्पादन येते.
विद्यार्थी प्रतिनिधी संजय कर्डिले यांने आभार मानले.