नेवासा
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या रकमेत ७५ हजारांची वाढ
करण्यात आली असून ही रुक्कम आता २५ हजारांवरुन १ लाख रुपये करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. शासन निर्णयान्वये हा पुरस्कार प्रदान करण्याची कार्यपध्दती तसेच या पुरस्कारातंर्गत रु.२५ हजार एवढी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ करण्याची तसेच पुरस्काराच्या छाननी समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत पुरस्कार प्राप्त महिलेस रु. १ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.पुरस्कारासाठी विहीत करण्यात आलेल्या निकषानुसार पुरस्कारासाठी पात्र महिलांचा शोध घेण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी छाननी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
सदर छाननी समितीची पुनर्रचना करण्यात येत असून सुधारीत छाननी समिती खालील प्रमाणे राहील….
कुलगुरु, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई(अध्यक्ष),आयुक्त, महिला व बालकल्याण आयुक्तालय, पुणे अथवा त्यांचे प्रतिनिधी(सदस्य),
महिलांच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेली नामनिर्देशित महिला प्रतिनिधी(सदस्य),संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे(सदस्य),
सहसंचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे(सदस्य सचिव).
सदर समितीने परिपूर्ण प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनस्तरावरील निवडसमिती समोर सादर करावेत.सदर पुरस्कारासाठी दिलेल्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज प्राप्त न झाल्यास शासन निर्णय दि. १५ डिसेंबर २०११ नुसार निकषांची पुर्तता करणाऱ्या महिलांची शिफारस छाननी समितीने शासनास करावी.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत पूर्वीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले कार्यपध्दती व निकष जसेच्या तसे लागू राहतील असे ही नमूद करण्यात आले आहे.