मुंबई
महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणा-या व्यक्तींना या वर्षा पासून “महाराष्ट्र वनभूषण” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.२० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यबाबदचा शासन निर्णय जारी केला आहे.त्यात म्हंटले आहे की,
महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना “महाराष्ट्र वनभूषण” पुरस्कार प्रदान करण्याचे शासनाने ठरविले आहे. वनक्षेत्रामध्ये जैव विविधता संगोपन, वन्यजीव संवर्धन, वनसंरक्षण, मृद व जलसंधारण, दस्तऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण इत्यादि क्षेत्रांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करुन त्याद्वारे लोकजागरण करणे, लोक चळवळ उभारणे अशा प्रकारची कामगिरी करणा-या व्यक्तींना महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार
महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणा-या व्यक्तींना “महाराष्ट्र वनभूषण” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पुरस्कार स्वरुप – २० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
*पुरस्कारासाठीचे निकष:-*
*राज्यातील वन व वानिकी क्षेत्रामध्ये कार्य करणा-या व्यक्तीची पुढील निकषानुसार निवड करण्यात येईल.
*गैरसरकारी संसाधनांचा वापर करुन लोकजागर व लोकचळवळीच्या माध्यमातून वन व वानिकी क्षेत्रामध्ये जसे की, जैवविविधता संगोपन, वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, मृद व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर, पर्यावरण सजगता, महत्वाचे दस्तऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण इत्यादि विविध शाखांमध्ये उल्लेखनीय कार्य असावे.
*उपरोक्त शाखांमधील कार्यामुळे लोकचळवळीद्वारे वनसंवर्धनासाठी असाधारण योगदान दिलेले असावे.
* सदरहू पुरस्काराकरिता कार्यरत शासकीय/निमशासकीय/अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील अधिकारी/कर्मचारी पात्र नसतील.
याशिवाय सदर व्यक्तीचे चारित्र्य निष्कलंक व सचोटी निर्विवाद असणे आवश्यक आहे. ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याची अधिवासी असावी.
*पुरस्कार निवडीची पध्दत:-
महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार योजना राबविण्यासाठी राज्यस्तरीय शोध व छाननी समिती तसेच निवड समिती गठित करण्यात येत आहे. सदर समित्यांची रचना खालीलप्रमाणे राहील:-
*शोध व छाननी समिती:–
——————————-
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव वने (अध्यक्ष), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल), नागपूर(सहअध्यक्ष), वन व वानिकी क्षेत्रामध्ये कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,वन व वानिकी क्षेत्राबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रभावी कार्य करणारा प्रतिनिधी, कृषि विद्यापीठामधील वन व वानिकी क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधी,सेवानिवृत्त वन अधिकारी,
आवश्यकतेनुसार निमंत्रीत व्यक्ती (सदस्य)व प्रधान मुख्य वनसंरक्षक,वनबल प्रमुख ठरवतील ते (सदस्य सचिव)
शोध व छाननी समिती निकषानुसार “महाराष्ट्र वन भूषण” पुरस्कारासाठी ५ योग्य व्यक्तींची शिफारस निवड समितीस करेल.
*निवड समिती:–
—————–
वन मंत्री (अध्यक्ष),अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (वने), सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत शासन नियुक्त प्रतिनिधी,प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख (सदस्य सचिव).
निवड समिती “महाराष्ट्र वन भूषण” पुरस्कारासाठी शोध व छाननी समितीने शिफारस केलेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीची निवड करेल.शोध व छाननी समिती तसेच निवड समिती यांची रचना व त्यातील सदस्यांची नियुक्ती करण्याचे अथवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. पुरस्काराकरिता निवड समितीने शिफारस केल्यानुसार व्यक्तींना पुरस्कार देण्याबाबत अंतिम निर्णय शासन घेईल. पुरस्काराचे स्वरूप व निकष यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. पुरस्कारासाठीची निवड ही पात्र व्यक्तींच्या उपलब्धतेवर अवलंबून राहील.