माय महाराष्ट्र न्यूज: : देशात विक्रमी कापूस उत्पादनाचे हवेतले अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर कापूस खरेदीदार, व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहेत. शेतकऱ्यांकडील
कापूससाठा संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती आहे.शेतकऱ्यांना यंदा कापसाला सरासरी ६६०० रुपये
प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत. कापसाचे तीन-चार वेगवेगळे दर यंदाही होते. हमीभावात कापूस खरेदी फक्त सुमारे सहा ते सव्वासहा लाख कापूसगाठींएवढी (एक गाठ १७० किलो रुई) झाली आहे.
याचा अर्थ देशातील फक्त २६ ते २७ लाख क्विंटल कापसाची हमीभावात (७०२० रुपये) खरेदी झाली आहे, तर २१० लाख गाठींएवढ्या कापसाची खरेदी सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटलने खासगी खरेदीदार, व्यापाऱ्यांनी केली आहे.
एक कापूसगाठ तायर करण्यासाठी पाच क्विंटल कापसाची आवश्यकता असते. कापसाचे उत्पादन देशात सतत चार वर्षे गुलाबी बोंड अळी व नैसर्गिक समस्यांमुळे कमी-कमी होत आहे.
परंतु वस्तुस्थिती दुर्लक्षित करून देशात १२७ ते १२९ लाख हेक्टरवर कापूस लागवड होते, हाच मुद्दा धरून कापूस उत्पादनाचे अंदाज व्यक्त करण्यात आले. कापूस दर मागील नऊ महिन्यांपासून ६६००, ६८०० ते ७१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
कमी दर्जाच्या कापसाची ५००० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी व्यापाऱ्यांनी केली. दुसरीकडे हमीभावासाठी शासनाने ठोस कार्यवाही केलेली नाही, अशी स्थिती आहे.
यंदा कापूस बाजार अस्थिर आहे. शेतकऱ्यांना मोठा तोटा कापूस पिकात आला आहे. देशात यंदा २९० ते २९५ लाख कापूस गाठींचे उत्पादन येईल, असे म्हटले जात आहे. परंतु कमी पाऊसमान, गुलाबी बोंड अळी आदी संकटांनी कापूस पीक पुरते खराब झाले.
२९५ लाख गाठींचे उत्पादन होईल की नाही, याबाबतही शंका आहे. परंतु कापूससाठा अधिक आहे, अशी बतावणी खरेदीदार, विविध कापूस व्यापारातील संघटनांनी सातत्याने केली. डिसेंबर, जानेवारीत कापूस आवक प्रतिदिन सरासरी एक लाख ८० हजार गाठींएवढी झाली आहे.
शेतकऱ्यांकडील कापूससाठा ज्या वेळेस १८ ते २० टक्के एवढा असतो व कमाल कापूस खरेदीदार, व्यापारी, कारखानदारांकडे पोचतो, त्या वेळेस कापूस दरवाढ सुरू होते, असा मुद्दा यानिमित्त जाणकार उपस्थित करीत आहेत.