माय महाराष्ट्र न्यूज :”पावसाने नुकसान झाल्यानंतर शेतकरी नुकसानीच्या पूर्वसूचना देत आहेत. मात्र पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांनी त्या पिकाला काढणी पश्चात नुकसान किंवा उभे पीक नुकसान यापैकी योग्य पर्याय निवडून पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
तसेच कापूस पिकासाठी काढणी पश्चात नुकसान हा पर्याय लागू होत नाही.सध्या सोयाबीनची काढणी राज्यभरात सुरु आहे. पण मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसानही वाढत आहे. शेतकऱ्यांनी
नुकसानीच्या पूर्वसूचना देताना आपले पीक उभे आहे की कापणी करून वाळवण्यासाठी ठेवलेले आहे, त्यानुसार योग्य तो पर्याय निवडणे आवश्यक आहे.”सोयाबीन काढणीला आलेले असेल आणि पिकाचे नुकसान झाले असेल तर उभ्या पिकाचे
नुकसान हा पर्याय निवडून पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. पण जर पिकाची काढणी करून सोयाबीन वाळवण्यासाठी ठेवलेले आहे किंवा पेंढ्या बांधून ठेवलेले आहे तर त्यासाठी क्राॅप स्प्रेड आणि बंडल हा पर्याय निवडावा. यामुळे नुकसान काढणीपश्चात नुकसानीमध्ये जाईल.
कापसाची काही भागात वेचणी सुरु झाली. मात्र कापूस पिकाचेही नुकसान होत आहे. कापूस वेचणीला आला म्हणून अनेक शेतकरी काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडून पूर्वसूचना देतात. मात्र कापूस पिकासाठी काढणी पश्चात नुकसान हा
पर्याय लागू होत नाही. कारण कापूस वेचणीनंतर वाळवण्याची गरज नसते. त्यामुळे कापसाच्या काढणी पश्चात नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपन्या फेटाळतात. त्यामुळे कापूस पिकासाठी उभे पिकाचे नुकसान हा पर्याय निवडावा पीक विम्यासाठी
नुकसानीच्या पूर्वसूचना देताना पावसाच्या आकडेवारीच्या नोंदीचा घोळ निर्माण होत आहे. कारण पावसाची महावेधकडे नोंद होताना सकाळी ८.३० ते दुसऱ्या दिवशी ८.३० अशी नोंद होते. म्हणजेच ज्या दिवशी पावसाने पिकाचे नुकसान झाले त्या दिवशीच्या पावसाची नोंद दुसऱ्या
दिवशी होते. त्यामुळे ज्या दिवशी पावसाची नोंद झाली त्या दिवशी नुकसान झाल्याचे अनेक शेतकरी नोंदवतात.पण पीक विमा कंपन्यांना टी+१ नुसार नोंद जरी दुसऱ्या दिवशी झाली तरी झालेला पाऊस त्याच दिवशी गृहीत धरावा म्हणजे ज्या दिवशी
पाऊस झाला तोच दिवस गृहीत धरावा, असा नियम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या दिवशी आपल्या पिकाचे पावसाने नुकसान झाले त्याच दिवसाची नोंद करावी, असे एका विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.