Thursday, February 12, 2026

भारतीय हवामान खात्याकडून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दि. 07/05/2025 रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “ऑरेंज अलर्ट” प्रसारीत करण्यात आलेला आहे.

तसेच दि. 08/05/2025 रोजी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट” प्रसारीत करण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे….

1) मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.

3) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लॉबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.

4) जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.

5) वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

6) गारपीटी दरम्यान मोकळया जागेवर आल्यास बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

7) धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.

8) वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.

9) शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

10) जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यांपासून स्वतःचे व त्यांच्या जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.

अरुण उंडे
प्र.निवासी उपजिल्हाधिकारी
तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहिल्यानगर

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!