Thursday, February 12, 2026

महाराष्ट्र अंनिस ही त्यागातून उभी राहिलेली संघटना-मकरंद पाटील

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

शहादा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. दाभोलकरांनी स्वतः खूप मोठा त्याग केला, स्वतःचे जीवन समर्पित केले. साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून पुरुषोत्तम फाउंडेशनचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते साध्या बसने प्रवास करून शहादा येथे आले. अशा नेतृत्वाच्या अनुकरणातून व त्यागातून उभी राहिलेली महाराष्ट्र अंनिस ही संघटना असल्याचे गौरवोद्‌गार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी अंनिसच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उ‌द्घाटन सत्रात व्यक्त केले.

लोणखेडा (ता. शहादा) येथील पू.सा.गु.वि.प्र. मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तीन दिवसीय विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीला ३० रोजी सुरुवात झाली.  राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशीलकर, गजेंद्र सुरकार, नंदुरबारचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पटेल, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शेंडे, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा
कार्याध्यक्ष वसंत वळवी, जिल्हा सचिव रायसिंग पाडवी, अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष विष्णु गायकवाड,जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा आदी यावेळी उपस्थित होते.

प्रा. मकरंद पाटील पुढे म्हणाले की, अण्णा साहेबांनी संस्थेची स्थापना करून परिसरात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शिक्षण आवश्यक आहे. अंनिस कार्यकर्त्यांचे पोटतिडकीने केलेले कार्य समाजाला
योग्य दिशा देऊन पुढे नेणारे आहे. समाजासाठी वेळ देणाऱ्या व संविधानानुसार वाटचाल करणाऱ्यांची संख्या सध्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशावेळी डॉ. दाभोळकरांच्या विचाराने चालणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तिचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

डॉ. शशांक कुलकर्णी यांनी नियोजन केले. राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, संजय बनसोडे यांनी चांगल्या काम करणाऱ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक वसंत वळवी यांनी केले. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले तर डॉ. बी. डी. पटेल यांनी आभार मानले.

*डाकीण पीडितांच्या हस्ते उद्घाटन…

अंनिसच्या विस्तारित राज्य कार्यकर्ता बैठकीचे उद्घाटन डाकीण ठरवितात आलेल्या सेवीबाई वसावे (सरी, ता. अक्कलकुवा), फोतीबाई वसावे (पाणबारी, ता. अक्कलकुवा), बॉडीबाई राऊत (काठी, ता अक्कलकुवा) यांच्या हस्ते करण्यात आले. डाकीण ठरवण्यात आलेल्या महिला सहन करणाऱ्या शोषण, शिवीगाळ, बहिष्कार, खून अशा विविध प्रकारच्या छळातून सोडवणुकीची प्रतीकात्मक कृती अशा अनोख्या पद्धतीने बैठकीचे उद्घाटन करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!