Wednesday, February 11, 2026

हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाजात परिवर्तन घडवून आणावे-सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजात परिवर्तन घडवून आणत एक बलशाली राष्ट्र निर्माण करावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी गंगापूर येथे केले. तर हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

गंगापूर(जि.छत्रपती संभाजीनगर) येथील जि. प. प्रा. शाळेच्या प्रांगणात शुक्रवार दि.१६ रोजी हिंदू संमेलन समिती, गंगापूर यांच्या वतीने हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने भव्य “हिंदू संमेलन” संपन्न झाले.यावेळी मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत बोलत होते.श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरीजी महाराज, श्रीक्षेत्र सरलाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज,श्रीक्षेत्र वेरूळयेथील जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सरसंघचालक डॉ.भागवत पुढे म्हणाले की, “जगाला हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवावा लागेल. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसे करावे लागेल. भारताच्या भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार आहे. त्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाज परिवर्तन घडवून आणावे.आपल्याला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्याला केवळ ओठात नको कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. आपल्या जगणे जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपण आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीला अर्थ राहील. ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या तर आपला समाज बलशाली होईल, असे ते म्हणाले.

महंत भास्करगिरीजी महाराज म्हणाले, “संघाने मान अपमान सहन करत शंभर वर्षाचा प्रवास केला आहे. जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केलं. आता हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले.

रामगिरीजी महाराज यांनी बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधले. ते म्हणाले आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्या समाजातील जातीवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल. त्यानंतर शांतीगिरी महाराजांनी समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत करा, ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल.

सुनील छत्रे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या संमेलनाची पार्श्वभूमी मांडली. आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!