माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या १२० उमेदवारांची प्राथमिक यादी नवी दिल्लीतील बैठकीत निश्चित झाल्याची माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. अन्य काही जागांवर चर्चेसाठी बुधवारी पुन्हा नवी दिल्लीत बैठक होणार
असून, यानंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता वरिष्ठ नेत्याने खासगीत बोलताना वर्तवली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी बैठक
होणार आहे. भाजपच्या महाराष्ट्राच्या निवडणूक समितीची बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत विधानसभेसाठीच्या १२० मतदारसंघांच्या उमेदवारांच्या प्राथमिक यादीवर सविस्तर चर्चा पूर्ण करण्यात आली आहे. या १२० जागांव्यतिरिक्त
आणखी १० जागांवर सध्या चर्चा सुरू असून त्यावरही जवळपास एकमत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, या १२० जागा वगळता उर्वरित जागांपैकी २० टक्के जागांवरील चर्चा बाकी आहे. या चर्चा समांतर
चालू ठेवतानाच विद्यमान जागांवरील नावे अंतिम करण्यासाठी अलीकडेच प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर संभाव्य उमेदवारांच्या यादीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत १२० जागांवरील उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे.मुंबईसह राज्यातील अनेक मतदारसंघांतील सर्वेक्षणात
विद्यमान आमदारांविरोधात मत व्यक्त झाल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघांबाबत स्थानिक गणिते, सर्वेक्षणाचे अहवाल आणि स्थानिक भाजप पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून माहिती घेतल्यानंतरच
याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने बुधवारी नवी दिल्लीत बोलविलेल्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जवळपास नावे निश्चित झाली
असून निवडणूक प्रचारात आघाडी घेण्यासाठी ही यादी बुधवारी किंवा गुरुवारीच जाहीर केली जाईल, अशी माहिती या वरिष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना दिली.