नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या दहिगाव-ने कृषि विज्ञान केंद्र येथे बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी नारळ पिक कार्यशाळा संपन्न झाली.
नारळ विकास बोर्डाचे प्रभारी उपसंचालक रविंद्र कुमार यांनी नारळ विकास बोर्ड अंतर्गत राबवण्यात येणा-या विविध योजना व उपक्रम तसेच नारळ उत्पादन वाढवणे, नारळाचा प्रसार करणे, नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे व नारळ पिक विमा योजना याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
तर कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने व नारळ विकास बोर्ड, ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी शास्त्रीय पद्धतीने नारळ लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतक-यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्रांतर्गत राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांचा शेतक-यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
कृषि विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ माणिक लाखे यांनी नारळ पिकातील प्रमुख किडी व रोग व त्यांचे नियंत्रण या विषयी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
नारळ विकास बोर्ड, ठाणे चे तांत्रिक सहायक विपणन बिपीन पी. यांनी नारळ पिकाचे शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले.
श्रीधर तोडकर यांनी नारळ रोप वाटिकेतील स्वअनुभव कथन केले. सचिन जोंधळे यांनी उपस्थित शेतक-यांना शेतीतील वन्यप्राणी प्रामुख्याने रानडुकरांचा बंदोबस्त कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले.
उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ नंदकिशोर दहातोंडे यांनी प्रास्ताविक करताना माणसाच्या जीवनात नारळ पिकाचे महत्त्व, नारळ पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच कृषि विज्ञान केंद्रा अंतर्गत राबवण्यात येणारे विविध उपक्रम व सेवा सुविधांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शेतक-यांना तांत्रिक पद्धतीने नारळ लागवडीचे कृती प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यामुळे नारळ लागवड करताना वारंवार होणाऱ्या चुका टाळता येतील. या कार्यक्रमामध्ये ७० पेक्षा अधिक शेतक-यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि
विज्ञान केंद्राचे अनिल देशमुख, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, अनिल धनवटे, रामनाथ लांडगे, अंकुश क्षिरसागर, अशोक पांगरे यांनी प्रयत्न केले.