नेवासा/सुखदेव फुलारी
नदी सुशोभीकरणा ऐवजी नदी पुनर्जीवन यावर भर दिला पाहिजे. नद्यांमध्ये पाण्याचा पर्यावरणीय प्रवाह येऊन त्या प्रवाहित राहिल्या पाहिजेत. नद्यांमध्ये दुषित पाणी येता कामा नये असे प्रतिपादन मॅगसेस पुरस्कार व स्टॉकहोम पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
महाराष्ट्र शासन आंगीकृत असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) जलसाक्षरता केंद्राचे वतीने दि.१६ मार्च ते २२ मार्च जलजागृती सप्ताहा निमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन जलसंवाद कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात दि.२३ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता “शाश्वत विकास आणि जलसाक्षरता” या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ.राजेंद्र सिंह बोलत होते. यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे,जयाजी पाईकराव,लक्ष्मीकांत वाघावकर,इंजी. राजेश रिठे,भजनदास पवार, सुखदेव फुलारी, रविंद्र इंगोले, अंकुश नारायणकर,
यशवंत लोणकर, सचिन सूर्यवंशी,मनोहर सरोदे यांचेसह राज्यभरातील जलनायक, जलयोद्धा ,जलप्रेमी, जलदूत ऑनलाइन उपस्थित होते.
डॉ.राजेंद्र सिंह पुढे म्हणाले की,जग,देश, राज्यावर आलेल्या जलसंकटावर उपाय समाजाला जलसाक्षर करणे हा जागतिक जलदिनाचा उद्देश आहे.पाण्याचे प्रदूषण, भूजलाचे शोषण आणि अतिक्रमण यामुळे जलसंकट वाढत आहे.
अगोदर संवाद,संवादातून निष्कर्ष आणि निष्कर्षातून उपाय या तीन बाबी मधून जलसंकट दूर होऊ शकते. शाश्वत विकास आणि जलसाक्षरता एकमेकांवर अवलंबून आहे. जलसाक्षरता अखंड चालू राहिली पाहिजे. सर्व शासकीय विभागात उचित समन्वय आवश्यक. चांगले काम करणारे लोकांना एकत्र आणा, प्रोत्साहित करा.
गाव हे घटक (unit) आणि नदी ही व्यवस्था (system) मानून कार्यक्रम रुपरेषा आखा आणि जल यात्रांचे नियोजन करावे.
विविध जलविषयक कार्यशाळा , प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. प्रशिक्षण म्हणजे जलसाक्षरतेची सुरुवात आहे.परंतु कार्यक्षेत्रावर परिणाम देणारे (result oriented) काम दिसले पाहिजे.जलनायक व इतर स्वयंप्रेरित फळींनी ही संपूर्ण झोकून देऊन काम करावे.चला जाणूया नदीला , एक छान उपक्रम, स्तुत्य कार्य सुरु आहे,मात्र राज आणि समाज यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. यशदाचे जल साक्षरता केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे.जलनायक, जलयोद्धा ,जलप्रेमी, जलदूत यांची कुशलता वाढविण्याचे काम यशदा करत आहे,हे काम थांबू नये. प्रशिक्षित फळीने लोकसहभागातून गाव-तहसील पातळीवर एक तरी जल साक्षरतेचे मॉडेल तयार करावे आणि इतर लोकांना ही जलसाक्षर करावे. जलसाक्षरतेच्या कार्यात माझे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन राहील.
*या मान्यवरांचे लाभले मार्गदर्शन..*
या ऑनलाइन जलसंवाद कार्यशाळेत
दि.१६ मार्च रोजी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पदमश्री पोपटराव पवार यांनी शाश्वत जलसमृध्द गाव- हिवरेबाजार,
दि.१७ मार्च रोजी जलयोद्धा गोवर्धन कुलकर्णी यांनी महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ पाणी वापर संस्था,
दि.१८ मार्च रोजी जलनायक रमाकांतबापु कुलकर्णी यांनी नपाण्याचा ताळेबंद- जलअंदाजपत्रक व पीक नियोजन आराखडा, दि.१९ मार्च रोजी जलनायक उदयसिंह गायकवाड यांनी चला जाणुया नदिला-नदी प्रदुषण समस्या व उपाय योजना, दि.२० मार्च रोजी भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा,पुणे उपसंचालक श्रीमती भाग्यश्री मग्गीरवार यांनी चला भूजल जाणुया-महाराष्ट्राची भूजल रचना व जलसाक्षरता, दि.२१ मार्च रोजी बालभारतीचे माजी संचालक कृष्ण कुमार पाटील यांनी जलसाक्षरतेमध्ये शालेय जलसाक्षरता महत्व व कृती कार्यक्रम तर दि.२२ मार्च रोजी पद्मश्री चैत्रराम पवार यांनी मार्गदर्शन केले.