Tuesday, June 17, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी २८ वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने केले.

अहिल्यादेवी होळकर यांनी काशी, अयोध्या, मथुरा, पंढरपूर, नाशिक, जेजुरीसह देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांच्या स्वतःच्या निधीतून केला. त्यांनी सोमनाथ येथील मंदिर नव्याने बांधले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करतांना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. एवढी श्रीमंती असतानाही त्या योग्याप्रमाणे जीवन त्या साधेपणाने जीवन जगल्या. त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केले नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले, म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या.

*महिला सक्षमीकरण आणि आदर्श न्यायदान*
गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी माहेश्वर येथे त्यांनी एक मोठे वस्त्रउद्योग केंद्र उभारले, तेथे माहेश्वरी वस्त्र तयार होऊ लागले. त्यांनी एक समृद्ध अर्थव्यवस्था उभी केली. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या. त्यांच्या सैन्यदलात शिस्त होती, कौशल्य होतं, आणि युद्धसज्जतेसाठी त्यांनी स्वदेशी तोफांचं उत्पादनही सुरू केलं. न्यायपद्धतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रगतीशील होता. अहिल्यादेवींची आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रसतांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. सर्वसामान्यासारखे न्यायदान करतांना हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.

*श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज ३०० वर्षांनंतरही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने शासनाने ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यांच्या नावाने एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’, आणि त्यांच्यावर आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांचे कार्य देशभरात पोहोचविले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*अहिल्यादेवी होळकर यांचे प्रजाहिताचे धोरण राबविण्यावर शासनाचा भर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. अहिल्यादेवींनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांसाठी सैनिक तुकडी सुरू करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली आहे.

अहिल्यादेवी निष्पक्ष व न्यायप्रिय राजमाता होत्या. प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती. त्यांनी रस्ते, पूल व घाट बांधले. अहिल्यादेवींचे प्रजाहिताचे धोरण आज शासन राबवित आहे. याच व्यासपीठावरून जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर शासन काम करत आहे. चौंडी विकासासाठी जो काही आवश्यक निधी लागणार होता, तो देण्याचे काम शासनाने केले आहे.

आज आपण लेक लाडकी म्हणतो तसे सूनही लाडकी मानली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनाच्यावतीने २०१७ पासून साजरी करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी शासनाने ६८१ कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मागणी केल्यानंतर अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आज देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्श समोर ठेवीत शासनाने लोकहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. धनगर समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जपण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने लोकराज्यचा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित इतर विशेषांक आणि पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, मोनिकाताई राजळे, शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, आमदार विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!