अहिल्यानगर/प्रतिनिधी
नव्याने नोकरीत रुजू होणारे अधिकारी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेणारे सामाजिक कार्यकर्त्यांची जडणघडण हिवरेबाजार मुळे होते. हिवरेबाजार हे आपल्यासाठी ग्रामविकासाचे तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे सहअध्यक्ष आनंद भंडारी यांनी केले
आदर्शगाव हिवरेबाजार येथे जलसाक्षरता केंद्र यशदा,पुणे व यशवंत कृषी, ग्राम व पाणलोट विकास संस्था तथा विस्तार प्रशिक्षण केंद्र हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. २२ ते २४ डिसेंबर २०२५ याकालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील जलप्रेमी,जलदूत व जलकर्मींसाठी आयोजित पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. भंडारी बोलत होते. आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,यशदाचे महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे,जलनायक रमाकांत कुलकर्णी, सत्र समन्वयक सुखदेव फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.भंडारी पुढे म्हणाले की,जल साक्षरता असो किंवा कोणतेही योजना असेल ती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पाझरली पाहिजे.तुकड्या तुकड्यात काम करण्यापेक्षा
टीम बिल्डिंग करून काम केले तर त्याची परिणामकारकता अधिक असते. हिवरेबाजार प्रमाणे शेवटच्या माणसाला सुद्धा या चळवळी जोडून घेतले पाहिजे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कुटुंबातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचता येईल याचे आम्ही नियोजन करत आहोत. जलसाक्षरता,घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापन वा कोणतीही थीम असू दे, त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांना सहभागी करून घेण्यात आपण कमी पडत आहोत. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत बऱ्यापैकी जनजागृती आहे,परंतु तरीही कळते पण वळत नाही अशी परिस्थिती असल्याने पाणी जाईपर्यंत कोणीही नळाची तोटी बंद करत नाही. समाज हा अनुकरणप्रिय आहे, त्यामुळे अगोदर आपण कृती करणे महत्वाचे आहे. वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. स्वतःही वाचले पाहिजे आणि मुलांना वाचनाची सवय लावण्याची गरज आहे. मास्टर ट्रेनर हा साचेबद्ध न राहता त्याला समोरील समुदायाला प्रेरित करता आले पाहिजे असे ही श्री. भंडारी म्हणाले.
*पद्मश्री पोपटराव पवार* म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात जलसाक्षरतेची खूप चांगली चळवळ सुरू आहे. या चळवळीत आवड असलेले आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास असणारी माणस आहेत.स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी कडून शंभरी कडे जात असतांना पुढील २५ वर्षात जे द्यायचे आहे ते देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.
डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व आनंद पुसावळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेत सोमवार २२ डिसेंबर रोजी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.यशदाचे उमेश डोंगरे यांनी शाळेचा उद्देश विषद केला. भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी महाराष्ट्रातील भूजल परिस्थिति – अहिल्यानगर जिल्हयातील भुरुपे व भूजल व्यवस्थापन, जल सुरक्षा आराखडा यावर मार्गदर्शन केले.जलप्रेमी श्रीमती अंजली कोतकर यांनी
पाण्याचा ताळेबंद व जलसाक्षरता गरज व महत्व यावर मार्गदर्शन केले.डॉ.दत्तात्रय वने यांनी पाणी वापर संस्था
सक्षमीकरण व लोकसहभाग यावर मार्गदर्शन केले.
मंगळवार २३ डिसेंबर रोजी जलप्रहरी
आदिनाथ ढाकणे यांनी चला जाणुया नदीला-नदी प्रदूषण, जलप्रदूषण समस्या आणि उपाय, श्री.सचिन साठे व श्री.सुखदेव फुलारी यांनी ।सिंचन कायदा १९७६,महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ व महाराष्ट्र जल नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील महत्वाच्या तरतुदी यावर मार्गदर्शन केले.जलनायक रमाकांत बापू कुलकर्णी यांनी पाण्याचा ताळेबंद व जलसाक्षरता यावर मार्गदर्शन केले.
बुधवार २४ डिसेंबर रोजी जलप्रेमी
संतोष दहीफळे यांनी जलप्रदुषण व पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी प्लॅस्टिक वापर व एकल वापर, प्लॅस्टिक बंदी व उपाययोजना, सौ.नूतन भगत यांनी अटल भूजल योजना जल सुरक्षा आराखडा व जलसाक्षरता,जलदूत संजय देशमुख यांनी पाणलोट क्षेत्र विकास आराखडा, पाणलोट उपचार व जलसाक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले.
अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अच्युतराव गीते यांनी मार्गदर्शन केले.
प्रा.विठ्ठलराव शेवाळे, विनोद धनवटे, मिलिंद बागल, अनुराधा आहेर, जयश्री घाडगे,हबीब सय्यद,वरुन राऊत,भगवानसिंग चंदेल आदींसह जिल्ह्यातील ५२ जलप्रेमी,जलदूत व जलकर्मी उपस्थित होते.
*जलसंपदा सचिव डॉ. संजय बेलसरे*
ऑडिओ संवादा द्वारे प्रशिक्षणार्थीशी संवाद साधताना जलसंपदा सचिव डॉ. संजय बेलसरे म्हणाले की, यशदा जलसाक्षरता केंद्र आणि हिवरेबाजार यांच्या संयुक्त विद्यमानाने हिवरेबाजार येथे २२ ते २४ डिसेंबर दरम्यान जलप्रेमी जलदूत यांचे पायाभूत प्रशिक्षण होत आहे या प्रशिक्षणामध्ये सहभागी सर्व प्रशिक्षणार्थी आणि व्याख्याते यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की मागील दोन दिवस आपण हिवरेबाजार या आदर्श गावांमध्ये प्रत्यक्ष त्या वातावरणामध्ये आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सानिध्या मध्ये हे प्रशिक्षण घेत आहे. निश्चितच हे प्रशिक्षण जलप्रेमी आणि जलदूत यांना अधिक उत्साहाने काम करण्यासाठी पायाभूत ज्या गोष्टी आहे, पाणी वापर संस्था, जलसाक्षरता आणि अनुषंगिक सर्व बाबी या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यामधील व्याख्याते पण अतिशय अनुभवही ज्यांनी यात काम केलेला आहे आणि एका ध्येयाने पेटलेले आहेत. मला खात्री आहे की या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये निश्चितच आपण पाणी वापर संस्था आणि जलसाक्षरता आणि प्रत्यक्ष काम, चला जाणून या नदीला या सर्व बाबीवर या तीन दिवसांमध्ये प्रशिक्षणार्थी यांना बेसिक माहिती मिळेल आणि ते प्रत्यक्ष जेव्हा प्रत्यक्षात काम करायला जातील निश्चितच त्याचा परिणाम पुढील काळा दिसू शकेल. मला खात्री आहे की, या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये हिवरेबाजार मध्ये आपण असल्यामुळे निश्चितच या सर्व प्रशिक्षणाचा अत्यंत लाभ आपल्याला झालेला असेल आणि पुढील प्रशिक्षणामध्ये निश्चितच आपण या तीन दिवसांमध्ये जे शिकला आहेत त्याच्या प्रत्यक्ष कृती करून तुमच्या अनुभव आपण शेअर करा, मला उत्सुकता असेल आपण केलेलं काम जाणून घ्यायला.


