माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाची संख्या कमी होत चालल्यानंतर दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून
स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी शिक्षणविभागाकडून घेतली जाणार आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेतून देता येणार आहेत. यासंदर्भातील हिंट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शिक्षकांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.विद्यार्थ्यांना स्वत:च्याच शाळेत परीक्षा केंद्र देऊ शकतो का? यावर शिक्षणविभागातर्फे विचार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच युट्यूब, टीव्हीच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेतील शिक्षकांनी मुलांकडून प्रॅक्टीकलची तयारी करुन घ्यावी. त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवावा. विद्यार्थ्यांना सुदृढ वातावरण देण्याची गरज असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी नमूद केले.
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घ्याव्यात यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आणि तसेच राज्यभरात विविध
ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. पण राज्यभरात विद्यार्थ्यांची संख्या आणि एकूण संसाधनांचा विचार करता ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. तरीही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका
असल्यास शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.दहावी, बारावीचे विद्यार्थी कोरोनाशी लढतायत आणि त्यांना अभ्यासाची देखील काळजी आहेत. दहावी, बारावी हा जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.
यामध्ये शिक्षक, शाळा, शासन सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे आणि शिक्षणही पूर्ण होणे यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.आपण सर्व जण गेले २ वर्षे कोरोनाशी सामना करत आहोत.
यावेळी शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही शिक्षकांनी गावखेड्यात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. यावेळी शिक्षकांचा मुलांप्रती असलेला जिव्हाळा दिसला असे सांगत त्यांनी शिक्षक वर्गाचे कौतुक केले.