माय महाराष्ट्र न्यूज :अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा आठवडाभरातील दुसरा प्रकार एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सुजाता शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलासह पती व सासू- सासर्याविरोधात अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील ही घटना घडली आहे.
नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह मे 2020 मध्ये तालुक्यातील एका मुलासोबत लावून देण्यात आला होता. मुलीचे आई-वडिल, सासू-सासरे व पती यांनी संगनमत करून सदरचा विवाह पार पाडला. मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या पतीने तिच्याशी संबंध ठेवले. यातून ती मुलगी गर्भवती राहिली.
प्रसृतीसाठी मुलीला रूग्णालयात दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. मुलीची प्रसृती झाली असून तिचे बाळ मयत झाले आहे.नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सदाशिव कणसे, महिला पोलीस शिपाई शेळके यांनी सदर मुलीचा जबाब नोंदविला आहे.
या जबाबावरून पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.