माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळी संपताच ऐन थंडीत विधान परिषदेचे राजकारण तापणार आहे. विधान परिषद सदस्य होण्याची कामना अनेकांनी मनी धरली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली. राज्यात सत्तेचे समिकरणही बदलले.
जिल्ह्यातही राजकीय वर्चस्वाच्या सुकाणूने हेलकावे घेतले. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधान परिषद निवडणूक होत आहे. यावर राजकीय पक्षांनी विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे.
दिवाळीच्या तोंडावर विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणाची आतषबाजी रंग उधळणार, अशी चिन्हे आहेत. उमेदवारीबाबत अस्पष्टता असताना भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी विधान परिषदेतील मतदारांना दिवाळीची मिठाई भेट
पाठवल्याने त्यांचे राजकीय मनसुबे स्पष्ट झाले आहेत. अन्य इच्छुक अद्याप पक्षश्रेष्ठींकडे नजरा लावून बसलेले असताना कर्डिलेंनी विधान परिषदेची अप्रत्यक्ष तयारीच सुरू केल्याने यंदाचा विधान परिषदेचा सामना ‘तोलामोला’चा ठरणार असल्याची चर्चा आहे.
शनिवारी विधान परिषद निवडणुकीतील मतदारांसह महत्त्वाच्या नेत्यांना दिवाळी मिठाईचे बॉक्स पाठवल्याची चर्चा वेगाने राजकीय वर्तुळात पसरली. 5 तारखेला प्रत्यक्ष भेटीने नियोजनही त्यांनी फराळ कार्यक्रमाच्या निमित्ताने केले आहे. यावरून त्यांनी उमेदवारी
करण्याचे निश्चित केल्याचे मानले जात आहे. सध्यातरी त्यांचे नाव भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात असले तरी ऐनवेळी वेगळा डावही मांडला जावू शकतो, अशी चर्चा आहे.भाजपकडून एकटे कर्डिले इच्छुक नाहीत. तर उत्तरेतील आखणी दोन नेत्यांनी पडद्याआड तयारी सुरू केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
भाजपने अद्याप तरी कोणत्याही नेत्याचे नाव विधान परिषदेसाठी पुढे केलेले नाही. भाजपकडून कर्डिले यांना उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी ते राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील का? या स्थितीत राष्ट्रवादीतील इच्छुकांचे काय होणार? कोणाकडे कोणता राजकीय पर्याय उपलब्ध असेल? याविषयी दिवाळी फराळासोबत खमंग चर्चा सुरू आहे.