माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.
अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे. याविषयावर कॅमेऱ्यावर बोलण्यास तूर्तास भाजपचे कोणतेही नेते तयार नाहीत. 2024 च्या एप्रिल आणि मे
महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर अवघ्या चार ते पाच महिन्यातच विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही संपत आहे. म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका सोबत घेणे शक्य होणार आहे.
मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राज्य विधानसभेतही जास्तीत जास्त जागा मिळवता येऊ शकतात, असा प्रदेश भाजपमधील धुरीणांचा होरा आहे. म्हणूनच दोन्ही निवडणूका एकत्र घेण्याचा प्रस्ताव
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्याचा भाजपचा प्रस्ताव यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींमुळे भाजपला फायदा होतो. देशाला
फायदा होतो का ?, असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपला सत्ता मिळावी यासाठी लोकसभा विधानसभा एकत्र घेण्याचं काम सुरू आहे. भाजपनं एकमेव धोरण आहे सत्ता. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच भाजपचे काम आहे. देशात
अनेक गोष्टी इतिहासांत घडल्या नाहीत ते काम भाजप करत आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. ते म्हणाले, एका राज्याचं बजेट केंद्र सरकारने थांबवले आहे. बाळासाहेबांची शिवसेना एका फुटलेल्या गटाच्या हातात दिली आहे.