माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्वच
भागात पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील काही गावांत गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, 10 एप्रिलपर्यंत पावसाळी वातावरण
राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.राज्यातील बहुतांश भागांत शुक्रवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारीही काही भागांत पावसाचा जोर होता. सिंधुदुर्ग जिह्यातील
कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील काही भागांत सोसाटयाच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे रब्बी हंगामातील आंबा, काजू, कोकम, सुपारी
आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले.विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावतीपर्यंत पावसाने हजेरी लावली. मराठवाड्याला खेटून असलेल्या बुलढाणा, जळगाव, नगर जिह्यांनाही अवकाळीने जबर तडाखा दिला.
एप्रिलमध्ये पावसाळी वातावरण बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अनेक शेतक-यांनी सांगितले. या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचीही नासाडी केली. पपई, खरबूज, टरबूज, आंबा, संत्री, कांदा पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी
पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.