शेवगाव/प्रतिनीधी
कोरोनामुळे प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष झाले तरी निवडणुका झाल्या नाहीत. सत्ताधारी संचालक मंडळाने वाढीव मुदतीत अर्थिक लाभापोटी सभाहित डावलल्याचा आरोप करीत गुरूकूल मंडळाच्या तालुका शाखेच्यावतीने प्राथ. शिक्षक बॅंकेच्या येथील शाखेसमोर बुधवारी ( दि. २ ) घंटानाद आंदोलन करण्यात आले. संचालक मंडळाने त्वरीत राजीनामे देऊन प्राथ. शिक्षक बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक त्वरीत जाहीर करण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.
गुरूकूल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्राथ. शिक्षक बॅंकेचे माजी संचालक रघुनाथ लबडे, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सचिन वांढेकर, गुरूकूलचे तालुकाध्यक्ष आत्माराम केदार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.या वेळी बॅंकेचे शाखाधिकारी महेश माने यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष होत आले तरी वाढीव मुदतीत संचालक मंडळाने अतिशय जबाबदारीने निर्णय घेणे अपेक्षित होते. प्रशासनही बॅंक अथवा सभासद हिताऐवजी संचालक मंडळाला साथ देत आहे. संचालकांनी वाढीव मुदतीत अर्थिक लाभापोटी सेवाज्येष्ठता डावलून कर्मचा-यांच्या पदोन्नत्या केल्या. नातलग असलेल्या निलंबित शिपायाला लेखनिकाचे पद देत वेतनवाढी दिल्या. त्यांच्या पगाराचा व फरकाचा तपशील सभासदांपुढे जाहीर करावा. संगणक खरेदी, त्या पाठोपाठ सीसीटिव्ही, सायरन खरेदीची आवश्यकता नसताना निविदा काढण्यात आली. वाढीव मुदतीतील ही बाब बॅंकेच्या दृष्टीने अत्यंत घातक व धोक्याची आहे. काही संचालक म्हणतात आम्हाला न विचारता निविदा काढण्यात आल्या आहेत. ही बाब म्हणजे कुणाला कुणाचा धरबंद राहिलेला नाही. संचालकच अंधारात असतील तर बॅंकेत मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. तरी थोडीजरी नैतिकता शिल्लक असेल तर सर्व संचालक मंडळाने त्वरीत राजीनामे द्यावेत. अन्यथा गुरूकूल मंडळ व शिक्षक समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष बापूराव आर्ले, दादासाहेब अकोलकर, अशोक टेकुळे, तुकाराम भगत, संजय गीतखने, निळकंठ आमले, दगडू गटकळ, रावसाहेब बोडखे, दिगंबर देवढे, निळकंठ लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, सुनंदा सातपुते, गोरक्षनाथ बर्डे, बाबूराव मुटकुळे, शिवाजी लबडे, रामनाथ कारगुडे, संजय पुंडे, बजरंग देवकर आदींसह कार्यकर्ते व प्राथमिक शिक्षक सभासदांच्या सह्या आहेत.
कोरोना काळात मिळालेल्या मुदतवाढीत संचालक मंडळाकडून गरज नसताना प्रमोशन, सीसीटिव्ही खरेदी,संगणक खरेदी,सायरन खरेदीचा घाट घालून सभासदांच्या भावना पायदळी तूडविण्याचा सपाटा चालू केला आहे. नैतिकता शिल्लक असेल तर संचालक मंडळाने राजीनामा द्यावा.
– रघुनाथ लबडे,
शिक्षकनेते तथा माजी संचालक प्राथ. शिक्षक बॅंक.