माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार पडणार असा दावा भाजप नेते सातत्याने करताहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, अशी
गर्जनाच शरद पवार यांनी केलीय. महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी यावेळी तरुण आमदारांना दिला.
सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार खडाजंगी रंगलीय. या वादळी अधिवेशात सहभागी होण्यासाठी शक्यतो बहुतांश आमदार उपस्थित आहेत. त्यात महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार,
आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर जवळपास दोन
तास ही बैठक चालली. या बैठकीत पवारांनी चर्चेमध्ये युवा आमदारांची मते जाणून घेतली. त्याचबरोबर यशस्वी राजकीय वाटचालीसाठी काही कानमंत्रही दिले.बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात
वर करीत आणि वज्रमूठ तयार करीत, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही
गोष्टी असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. जसे की दिवस-रात्र मेहनत घेण्याची तयारी, कामाचे मार्केटिंग, नियोजनबद्ध व्यूहरचना आखून निवडणूक लढण्याची तयारी. हे शिकावे, असे आवाहन केले.