माय महाराष्ट्र न्यूज:करोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होती. याकालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळ्याच्या सुटीतही
शाळा भरविण्याबाबत प्राप्त मागणीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण समिती सभेत देण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा बुधवारी उपाध्यक्ष तथा समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली
ऑनलाईन झाली. सभेत सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी सभेत सहभागी झाले होते. 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत सर्व जिल्हा
परिषद शाळांमधील पहिलीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबाबत, तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. एक दिवस शाळेसाठी या उपक्रमासह शैक्षणिक गुणवत्ता व दर्जावाढीसाठी भेटी देताना
अधिकार्यांनी शाळा भरण्याआधी किंवा सुटण्याआधी उपस्थित राहून पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शाळाप्रवेश, दहावी परीक्षा, तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीबाबत चर्चा झाली.गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे सर्वच
शाळा बंद होत्या. आता तिसरी लाट ओसरल्याने पहिली ते बारावीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. परंतु दोन वर्षांत विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाढ खुंटली. अनेक विद्यार्थ्यांचा लिखानाचा सराव राहिला नाही. दिवाळीत शाळा सुरू झाल्या. मात्र लगेच दिवाळीच्या
सुट्याही लागल्या. त्यामुळे आता वार्षिक परीक्षा झाल्यानंतर 1 मे ते 14 जूनदरम्यान उन्हाळा सुट्या लागतील. या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुशेष भरून काढण्याच्या अनुषंगाने शाळा सुरू ठेवण्याबाबत विचार सुरू
असून जेथून मागणी येईल तेथील शाळा सुरू ठेवा, अशा सूचना शेळके यांनी शिक्षणाधिकार्यांना दिल्या.