माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दीर आणि सासूला
अटक करण्यात आली आहेे. पती अनिल रामकिसन गुंजाळ (वय 31), दीर अमोल रामकिसन गुंजाळ (वय 27), सासू मंगल रामकिसन गुंजाळ (वय 45, सर्व रा. सोनेवाडी ता. नगर) अशी अटक
केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 एप्रिल, 2022 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. रेखा अनिल गुंजाळ (वय 24 रा. सोनेवाडी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
सासरच्या छळाला कंटाळून रेखा गुंजाळ हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सोनेवाडी शिवार, मेहेकरी फाट्याजवळ ही घटना घडली होती. याप्रकरणी अनिल गुंजाळ, अमोल गुंजाळ, मंगल
गुंजाळ व दीपक गोरख गुंजाळ (सर्व रा. सोनेवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रेखाचा भाऊ मोहन अण्णा वेठेकर (वय 30 रा. पांढरेवाडी कोळगाव ता. श्रीगोंदा) यांनी
फिर्याद दिली आहे. सासरच्यांनी रेखाचा घरगुती खर्चासह, शेती खर्चासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी छळ केला. तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. त्यांनी तीन आरोपींना अटक केली आहे.