माय महाराष्ट्र न्यूज:डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा खासगीकरणाचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. या गळीत हंगामामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना सहा लाख
मेट्रिक टन ऊस गाळप करून कारखान्याचे व राहुरी तालुक्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले आहे.डॉ. तनपुरे कारखान्याची 66 वी
ऑनलाईन अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडली. यावेळी खा. डॉ. विखे हे दिल्ली येथे असल्याने ऑनलाईन पद्धतीने ते उपस्थित राहिले. तर ही सभा
कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे अध्यक्षतेखाली पार पडली.नगर जिल्ह्यात सर्वात जास्त रिकव्हरी या कारखान्याची असून फेब्रुवारीपर्यंत उसाचे पेमेंट कारखान्याने सभासदांना व ऊस उत्पादकांना
अदा केले आहे. त्यामध्ये देखील हा कारखाना अग्रेसर आहे. यावर्षी कारखान्याने आत्तापर्यंत चार लाख 30 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. मात्र, आम्ही यावर थांबणार नसून हा गळीत हंगाम सहा लाख
मेट्रिक टन उसाचे गाळप केल्याशिवाय संपवला जाणार नाही. सभासद कामगार व हितचिंतक तसेच संचालक मंडळ यांच्या विश्वासामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.ज्यांनी हा कारखाना भ्रष्टाचार करून मोडकळीस
आणला, ज्यांनी कधी उसाचे टिपरू देखील कारखान्याला घातले नाही, अशांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. 1975 सालापासून कारखान्याच्या जागेवर उत्खनन सुरू आहे. हे आमच्या आधीच्या
लोकांचे पाप आहे. मात्र, मंत्र्यांच्या दबावाला बळी पडून आम्ही खासदार असताना देखील आमच्या कारखान्याला नोटीस पाठविली जाते, हे पाप आधी कोणी केले? हे त्यांनीच तपासले पाहिजे. आम्ही
अशा नोटिशीला अजिबात घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आमचा भ्रष्टाचार सिद्ध केला तर राजीनामे द्यायला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादक, कामगार यांना
कारखान्याच्या माध्यमातून न्याय देताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्हाला मोठी साथ मिळाली आहे.