नेवासा
नेवासा तालुक्यातील रहिवाशी असलेले जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती राजेंद्र वाघमारे यांनाच लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची आग्रही मागणी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील आढावा बैठकीत पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
यावेळी उपस्थित दिग्गज नेत्यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या सूरात सूर मिसळल्याने वाघमारे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
शनिवार दि.३ जून रोजी मुंबईतील टिळक भवन येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्य पातळीवरील लोकसभा निवडणूक आढावा बैठक नुकतीच पार पडली.
यावेळी विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अमित देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील, आदी दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी लोकसभेचे उमेदवारी काँग्रेसकडून मिळावी अशी एकमुखी मागणी केली. आमदार बाळासाहेब थोरात तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना वाघमारे यांनी केलेला कामाचा अहवाल सादर करून त्यांच्या उमेदवारी मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अहमदनगर येथून काँग्रेसचे प्रदेश महासचिव बंटी यादव, प्रदेश समन्वयक संजय भोसले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा सचिव दीपक कदम, नेवासा तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे, कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू, अध्यक्षा विद्या कदम, परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, सोशल मिडीया प्रमुख सचिन बोर्डे, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सगळगिळे, पंकज लोंढे, विजय जाधव, चंद्रकांत बागुल, कल्याणराव पिसाळ, विठ्ठल परदेशी, अनिल करपे आदी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
विजय आपलाच-अशोक चव्हाण
यावेळी माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी शिर्डी मतदारसंघातील आजवरच्या निवडणूकांचा लेखाजोखा मांडून सामाजिक समिकरणे चुकल्यानेच पक्षाला ही जागा गमवावी लागल्याचा निष्कर्ष काढला. या मतदारसंघातून राजेंद्र वाघमारे यांना उमेदवारी दिल्यास सामाजिक समिकरणे व्यवस्थित जुळून विजय आपलाच होणार असल्याचे उपस्थितांना ठणकावून सांगितले.