माय महाराष्ट्र न्यूज: राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व त्यांच्या संबंधित व्यक्तींवर सक्त अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाया सुरू आहेत. ऊर्जा व नगर विकास
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मालमत्तांवरही ईडीने कारवाई केली होती. याचा संदर्भ घेत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. प्राजक्त तनपुरे म्हणाले, केंद्र सरकारच्या
माध्यमातून राज्यातील विरोधक ईडीची भीती दाखविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. तर, महाविकास आघाडी शासन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. विरोधकांच्या ईडीला विकास
कामांतून उत्तरे देणार आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 155 कोटी 59 लाखांची तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे. योजनेत नव्याने 12 गावांचा समावेश केला आहे. योजनेत आता 43 गावे 186 वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे.
लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.राहुरी तालुक्यातील सोनगाव-धानोरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला सुद्धा 27 कोटींची तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
राहुरी शहराच्या पाणी योजनेचे काम वेगाने प्रगती पथावर आहे. ब्राह्मणी व सात गावे योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची मुख्य जलवाहिनी प्लास्टिक ऐवजी लोखंडी करून,
चेडगाव व मोकळओहोळ या दोन गावांचा नव्याने समावेश केला आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.