माय महाराष्ट्र न्यूज : जम्मू-काश्मीरसारख्या बर्फाच्छादित प्रदेशापासून संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशापर्यंत उष्णतेच्या लाटांमागून लाटा येत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून
महाराष्ट्रही आत्तापर्यंत कधी नव्हता इतका काहिलीने त्रासला आहे. मध्य महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत येत्या आठवडय़ात उष्णतेची आणखी तापदायक लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई-ठाण्यासह राज्यातील शहरी भागांतील पारा अचानक उसळी मारत असल्याचेही नमूद होत आहे.उत्तर-पश्चिमेकडील राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंडीगड तसेच हिमालयीन
विभागासह पश्चिम भागात गुजरात ते मध्य प्रदेशापर्यंत गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे सातत्याने
कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने महाराष्ट्रातही सातत्याने उष्णतेच्या लाटा आल्या. मुंबईसह कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एकापाठोपाठ उष्णतेच्या लाटांची स्थिती आली.
एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमानातील वाढ कायम राहिली. एप्रिलच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसांत यंदा मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, जळगाव, नाशिक आणि मराठवाडय़ातील औरंगाबाद,
परभणी आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी गेल्या आठ ते दहा वर्षांच्या तुलनेत तापमानाचा पारा अधिक राहिला. आता एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यातही विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान
४० ते ४१ अंशांच्या पुढेच आहे. मुंबई आणि उपनगरांचा पाराही सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगावमध्ये शनिवारी राज्यातील उच्चांकी ४४.० अंश तापमानाची नोंद झाली.
सोलापूर, नाशिक आदी शहरांचा पाराही ४० अंशांपुढे गेला होता.राजस्थान, हरियाणा आणि उत्तरेकडील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. गुजरातमध्ये सध्या लाट कायम आहे. परिणामी उत्तर -दक्षिण
देशातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. उत्तरेकडून वारे वाहणार असल्याने महाराष्ट्रातही दोन दिवसांनंतर सर्वत्र कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.