माय महाराष्ट्र न्यूज:अलीगढ येथे एका भाजप खासदाराच्या सुनेने केलेल्या एका मागणीची चांगलीच चर्चा रंगली आहे. तिने केलेली मागणी अवघ्या एका
महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन भाजप खासदाराने दिलं आहे.अलीगढ येथील कशीशो गावात राहणारे नवीन कुमार शर्मा यांचे भाजप खासदार सतीश गौतम यांच्याशी चांगलं नातं आहे.
2 एप्रिल रोजी शर्मा यांचा एकुलता एक मुलगा दीपांशू याचा विवाह हाथरस येथील मुरसान गावच्या प्रियंका सोबत झाला.कामाच्या व्यग्रतेमुळे सतीश गौतम हे विवाहाला अनुपस्थित राहिले होते.
त्यामुळे रविवारी नवदांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी ते शर्मा यांच्या गावी पोहोचले.तिथे मुंह दिखाई नावाची प्रथा पार पाडल्यानंतर गौतम यांनी प्रियंकाला आहेराचं पाकीट दिलं. पण, प्रियंकाने मात्र
आहेर म्हणून वेगळीच मागणी केली. ती म्हणाली की, मी ज्या मंदिरात रोज अभिषेक करायला जाते, तिथपर्यंतचा रस्ता खूप खराब आहे. तो रस्ता जर तयार झाला तर फार बरं होईल, अशी मागणी प्रियंकाने गौतम यांच्याकडे केली.
तिच्या मागणीचा स्वीकार करून गौतम यांनी पुढील महिन्याभरात सदर रस्ता दुरुस्त करून देण्याचं आश्वासन दिलं. प्रियंकाच्या या मागणीमुळे ग्रामस्थ तिच्यावर भलतेच खुश झाले आहेत.