माय महाराष्ट्र न्यूज:सांगली येथे उपवनसंरक्षकाने एका महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे महिला वन
कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून राज्याचे वनखाते दीपाली चव्हाण प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहात आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
सांगली येथील उपवनसंरक्षक(प्रादेशिक) विजय माने यांनी एका महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा कार्यालयात विनयभंग केला. या महिला अधिकाऱ्याने धाडस दाखवत पोलिसात तसेच
महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे उपवनसंरक्षक माने अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत आहेत. शुक्रवारी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. मंगळवारी
१७ मे रोजी यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजूनही या प्रकरणात माने यांच्याविरोधात म्हणावी तशी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. अंतर्गत चौकशीच्या
अहवालाची ते वाट पाहात आहेत. दीपालीच्या आत्महत्येनंतरही अनेक चौकशी समित्या नेमण्यात आल्या. मात्र, तिच्या मृत्यूला सव्वा वर्ष लोटूनही अहवाल आले नाहीत. त्यामुळे
या प्रकरणातही असेच तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.विजय माने यांच्याविरोधात सांगली पोलीस ठाण्यात सहा मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांच्याकडून या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) यांच्या शिफारशीनुसार सहाय्यक वनसंरक्षक(वनीकरण)
डॉ. अजित सासणे यांच्याकडे तो हस्तांतरित करण्यात आला आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबलप्रमुख) डॉ. वाय.एल.पी. राव यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले.