अहमदनगर/ प्रतिनिधी
मुख्यालयी राहत नसून ही शासनाकडून घरभाडे लाटणाऱ्या शिक्षक-ग्रामसेवकांसह सर्व सरकारी कर्मचारी यांचेवर कारवाई करावी तसेच कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेच्या खोट्या ठरावांच्या सत्यतेबाबत उलट तपासणी करावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नेवासा तालुका सह प्रचार प्रमुख सोपानराव रावडे यांनी सोमवार दि.18 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजेपासून जिल्हा परिषद अहमदनगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, मुख्याध्यापक, कृषि सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व ग्रामीण भागातील इतर अधिकारी-कर्मचारी यांनी शासनाच्या आणि समाजाच्या हितासाठी मुख्यालयी राहून कामकाज करावे असे शासनाचे आदेश आहेत.
तसेच यासाठी त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी शासनाकडून घरभाडे भत्ता दिला जातो. तरी स्वत: च्या फायद्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांशी अधिकारी मुख्यालयी राहत नाही आणि मुख्यालयी राहण्यापासून सवलत घेऊन गावातील सरपंच, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधीकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी या वरिष्ठ अधिकार्यांना दर महिन्याला खंडणी देतात.
या सर्व बेकायदेशीर प्रकरणात सहभागी असणार्या अहमदनगर जिल्ह्यातील कार्यरत सर्व दोषी अधिकारी, पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल होण्यासाठी श्री.रावडे यांनी सोमवार दि. 18 जुलै 2022 पासून जिल्हा परिषद अहमदनगर येथे बेमुदत आंदोलन धरणे आंदोलन सुरू केले आहे.त्यांचे समवेत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नगर शहराध्यक्ष सुरेंद्र गांधी,नगर तालुकाध्यक्ष सचीन एकडे हे ही उपोषणात सहभागी झाले आहेत.