.
माय महाराष्ट्र न्यूज:निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. विशेष करून अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यामुळे असे जिल्हे किंवा शहरात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय आढावा घेऊन ठरवू. कारण कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढत असल्याची प्रशासनाकडून आकडेवारी येत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध कडक करायचे का, हे येत्या आठ दिवसांत ठरवू, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील मुख्यतः अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. अशा जिल्ह्यांतील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेत आहोत. त्यामुळे आणखी आठ दिवस आढावा घेण्यात येईल. त्यानंतर गरज आहे, त्याच जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
दरम्यान राज्यातील ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी तसेच समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी येत्या २६ आणि २७ जूनला लोणावळा येथे मेळावा घेणार आहे. त्यात विविध गोष्टींची चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे
विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. इतर मागास वर्ग समाजातील नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.