Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांची माहिती तात्काळ संकलित करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे.

अशा कोरोनाकाळात पालकांच्या मृत्युमुळे अनाथ झालेल्या मुला मुलींची अगदी गावपातळीपासूनची माहिती संकलित करुन ती जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे सादर कऱण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनीही अशा मुलांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडकाळात मृत्यू झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तर कृतीदलाची बैठक आज झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.जी. पाटील,

महानगरपालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक आर. एल. मोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, समिती सदस्य अॅड. बागेश्री जरंडेकर, प्रवीण मुत्याळ, पोलीस निरीक्षक मसूद खान, चाईल्डलाईनचे प्रतिनिधी महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

तसेच, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुकास्तरावरुन सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक यामध्ये सहभागी झाले होते.

सद्यस्थितीत जिल्हयात दोन्ही पालक गमावलेली एकूण ८ मुले आहेत. एक पालक गमावलेली एकूण १२६ बालके सापडली आहेत. मात्र, कोरोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना सामाजिक आधार देण्याचे काम राज्य शासनाच्या निर्णयानुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे यापासून जिल्ह्यातील कोणतेही बालक वंचित राहू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी तात्काळ ग्रामसेवकांमार्फत त्या-त्या गावांतील माहिती संकलित करुन अशा प्रकारे पालकत्व गमावलेल्या मुलांची माहिती संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची देखभाल करणारे नातेवाईकांचीही माहिती संकलित करुन या मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची माहिती घेवून त्याची नोंद तपासणी अहवालात घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ते म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने उपाययोजना आवश्यतक असून त्या तातडीने करण्याची गरज आहे. कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे.

अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात यासंदर्भातील माहिती फलक लावले जावेत. अधिकाधिक नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, यादृष्टीने यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या.

चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षणगृहांच्या ठिकाणी पुरेशी वैद्यकीय उपचार सु़विधा देण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे.

बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.तसेच, घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गमावल्याने विधवा झालेल्या महिलांनाही राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोनाने पालकत्व गमावलेल्या मुलांची माहिती संकलित केली जात असून त्यांची सामाजिक तपासणीही केली जात असल्याची माहिती दिली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!