मुंबई/सुखदेव फुलारी
जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हयातून अभ्यासासाठी घेण्यात आलेल्या नद्यांवर काम करणाऱ्या नदी प्रहरींना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच नदी संवाद यात्रेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे की,देशाच्या दैदीप्यमान स्वातंत्र्य वर्षाला आता ७५ वर्षे पूर्ण झाली असून आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या गौरवाच्या इतिहासातील हे महत्त्वाचे पर्व असून देशभरात अनेक उपक्रम, मोहिमा, अभियान हाती घेण्यात आलेले आहेत. भारत अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. जगातील काही मोजके देश आहेत ज्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपदा अदयापही अबाधित आहे, अशा देशांमध्ये आपल्या देशाचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते, भारतीय समाज जीवनामध्ये नद्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. नद्यांना प्रामुख्याने प्रदूषण, अतिक्रमण, आणि शोषण या तीन विकारांनी ग्रासले असून शासन त्यांच्या उपायासाठी प्रयत्नशील आहे; तथापि जनमानस आणि जागृत जलशिक्षित समाज निर्माण होणे आणि त्यांनी नदीची काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा नदीशी संवाद साधत साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये वीस हजार किलोमीटर लांबीच्या सुमारे २०० नद्या आहेत. या नद्यांशी संवाद साधणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुमारे ७५ प्रमुख नद्यांवर चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत नदी संवाद यात्रा प्रारंभ करण्यात आलेली आहे हे आपणास विदितच आहे.दि.०२ ऑक्टोबर २०२२ रोजी सेवाग्राम वर्धा येथून या यात्रेचा प्रारंभ झालेला आहे. महाराष्ट्रातील ७५ नदयांवर काम करणाऱ्या नदीप्रहरींना या कार्यक्रमांमध्ये जलकलश आणि भारताचा तिरंगा ध्वज सुपूर्त करण्यात आलेला आहे. स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रेरीत नदी प्रहरी नदीचा अभ्यास करत आहेत आणि नदीशी संवाद साधत आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला असून सुमारे ७५ नद्यांवर नदी प्रहरी काम करी करीत आहेत. नद्यांचे अभ्यासासाठी निश्चित कार्यप्रणाली आणि दिशा ठरवण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आलेली असून जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. जिल्हाधिकारी या नात्याने जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून आपल्या जिल्हयातून अभ्यासासाठी घेण्यात आलेल्या नद्यांवर काम करणाऱ्या नदी प्रहरींना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच नदी संवाद यात्रेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही आपणाकडून अपेक्षित आहे. आपण तत्काळ व्यक्तिशः या मध्ये लक्ष घालावे व जिल्हा नियोजन अधिकारी यांना योग्य ते निर्देश देऊन आवश्यक निधीची तत्काळ व्यवस्था करावी. तसेच जिल्हास्तरीय समितीच्या नियमित बैठका घेऊन, प्रत्येक नदीवर एक नोडल ऑफिसर याची नेमणूक करावी.
*उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र…*
ना.चंद्रकांत दादा पाटील
महोदय,
नद्यांच्या अभ्यासामध्ये नद्यांवर झालेल्या आघातांचा अभ्यास करणे हे प्राधान्य आहे. त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यानुसार त्याची पुढील कृती कार्यक्रम आणि उपचाराची दिशा ठरणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्ह्यात असणाऱ्या विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतने, कृषी विद्यापीठे, वैद्यकीय विद्यापीठ, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विद्यापीठ, या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना सदस्य म्हणून समितीवर स्थान देण्यात आलेले आहे. उन्नत भारत अभियान, आणि उन्नत महाराष्ट्र अभियान या अंतर्गत शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थात शिकत असलेले विद्यार्थी यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर समाजाभिमुख कामांमध्ये व्हावा हा यामागील उद्देश आहे.
उपरोक्त अनुषंगाने चला जाणूया नदीला हया अभियानात आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे अध्यापकांचा सहभाग अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण स्तरावर आणि नागरी स्तरावर अभ्यास करण्यासाठी नदी प्रहरींची फळी आहे. त्यांची मदत विद्यार्थ्यांना निश्चितच होईल.
विद्यापीठात असणाऱ्या विविध विभागातील उदाहरणार्थ वैद्यकीय, पशुवैद्यकीय कृषी अंतर्गत अभियांत्रिकी इत्यादी मधील तज्ञ अध्यापक आणि विद्यार्थी यांना या यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याबाबत तसेच विशेष अभ्यास करण्याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सुचना संबंधितांना देण्याची विनंती आहे.
-सुधीर मुनगंटीवार
मंत्री,वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय विभाग