माय महाराष्ट्र न्यूज :राज्यातील १६ हजारांहून अधिक पतसंस्थांमधील ठेवीदार सभासदांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, या मागणीच्या प्रस्तावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनुकूलता दर्शवली. तसेच, या प्रस्तावाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे
पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी
पवार यांची बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. या वेळी झालेल्या प्रदीर्घ चर्चेत पवार यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली.
नगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या अंतर्गत लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन फंड’ या योजनेद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यात आले आहे. त्या धर्तीवर संपूर्ण राज्यात ही योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा सहकारी
पतसंस्था स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केली. याबाबत पवार यांनी अनुकूलता दर्शविली. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, राज्य कुस्तीगीर संघाचे
उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, माजी महापौर भारती मुथा, मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन या वेळी उपस्थित होते.या संदर्भात कोयटे म्हणाले, पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत फेडरेशनने सहकार
खात्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु त्याला अद्याप मान्यता दिलेली नाही. ही मान्यता मिळाल्यास फेडरेशन पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यास सक्षम आहे. सहकार खात्यास अंशदान देण्यास आम्ही तयार आहोत. परंतु दरवर्षी जमा होणाऱ्या
केवळ ३५ कोटी रुपयांच्या अंशदानातून एक लाख कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण कसे देणार, याची योजना सहकार खात्याने सांगावी.