माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांवर लाळ खुरकूत संकट ओढवल्याने जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 8 ऑक्टोबरला काढले होते. जवळपास महिनाभर बाजार बंद राहिल्याने शेतकरी आणि बाजार समितीचे मोठे
आर्थिक नुकसान झाले. पशुपालक शेतकर्यांना कवडीमोल भावात जनावरे विकण्याची वेळ आली. त्यातून मोठे नुकसान झाले. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजार सुरू करावेत म्हणून पाठपुरावा केला.
अखेर त्यात यश आले.अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोणी खुर्द येथील जनावरे व शेळी-मेंढी आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने बळीराजा सुखावला आहे. उद्या बुधवार दि. 3 रोजी बाजार भरणार
असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा मिळाला आहे.लाळ खुरकूत आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने घेतलेला निर्णयही योग्यच होता. संसर्गाचा प्रतिबंध करण्याबरोबरच राज्यव्यापी लसीकरण योजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.
मात्र हा संसर्ग थांबल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश काढून जनावरांचे आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोणी खुर्द येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार देशभर प्रसिद्ध आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांबरोबरच
मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यांतून व्यापारी गायी, बैल, शेळ्या, मेंढ्या इ. खरेदीसाठी लोणीला येतात.