शेवगाव
शेवगाव तालुक्यातील भायगाव, बक्तरपूर,अंत्रे,देवटाकळी,
भातकुडगावसह परिसरात गारपीट व जोरदार वादळी वाऱ्यासह दि.७ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी केली.
शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी शेवगाव तालुक्यातील भायगाव, भातकुडगाव,बक्तरपुर, देवटाकळी,अंत्रे, शहरटाकळी भावीनिमगाव, दहिगावने परिसरात वादळीवारा, गारपीट व पावसाने शेतकऱ्यांचे कांदा,गहू व उन्हाळी बाजरीसह इतर पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.अनेकांचे घरावरील छत उडाले. आज दि.८ एप्रिल रोजी माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
श्री. घुले म्हणाले की,हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची वेळ येऊन ठेपली असून शेतकरी संकटात सापडलेला
असताना त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.जबाबदारीचे भान नसलेल्यांच्या हाती नेतृत्व गेल्यावर त्याचे कसे आणि काय परिणाम भोगावे लागतात,हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आज अन्नदाताच संकटात सापडला आहे,त्यांना खरी मदतीची गरज असताना संबंधितांना त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित मदत द्यावी,अशी मागणी मा.आ.चंद्रशेखरजी घुले यांनी केली.