माय महाराष्ट्र न्यूज:मागील तीन-चार दिवसांपासून बाजारात कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र, आता आज त्यात मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या दरात वाढ झाल्याचं
कळताच अनेक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.दरम्यान, फेब्रुवारीत कापसाचा भाव वाढेल या आशेवर शेतकरी होते. मात्र, होळीचा सण गेला तरीही कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले होते.
अजून किती दिवस कापूस घरातच ठेवायचा,असा चिंतातूर प्रश्न त्यांच्यापुढे होता. उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा भाव ८ हजारांच्या पुढे जात नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कापसाचा भाव प्रतिक्विंटल १०० ते ११० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे कापसाला ८ हजार ६७० रूपये इतका प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळत आहेत. कापसाबरोबर तुरीचे भावही वाढले आहेत.
त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, विदर्भातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ६०० पर्यंत भाव मिळत असला तरी, दुसरीकडे
मराठवाड्यात मात्र व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. मराठवाड्यात जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे.कापसाचे दर पुन्हा वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी
केले आहेत. सध्या बाजारात अफवा असली तरी कापसाचे भाव पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचे दरही टिकून राहतील, असंही जाणकारांनी म्हटलं आहे.यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखून
धरला त्यामुळं कापसाचे भाव टिकून आहेत, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये.
तसंच मार्च महिन्यापर्यंत कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.