नेवासा
जलमित्र सुखदेव फुलारी यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सन 2014 पासून प्रलंबित असलेले राज्यातील पाणी वापर संस्थांचे महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियाना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार जलसंपदा विभागाने जाहीर केले असुन राहुरी तालुक्यातील पाथरे येथील संत कदम माऊली पाणी वापर संस्थेला 5 लाख रुपयांचा चा राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे निर्मितीनंतर राज्याने सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी पाणी व्यवस्थापन व पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या हेतूने राज्यातील विविध प्रकल्पावर पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत.सिंचन व्यवस्थापनात लाभधारकांचा सहभाग यशस्वी होण्यासाठी कार्यान्वित पाणी वापर संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम राहून संस्था नेहमीसाठी स्वबळावर सुदृढपणे कार्यरत राहणे आवश्यक आहे. पाणीवापर संस्थांना प्रोत्साहन देण्याकरिता पाणीवापर संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये स्पर्धा निर्माण होण्यासाठी महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय शासनाने 2009 मध्ये घेतलेला आहे.
या पुरस्कार स्पर्धेकरीता पाणी वापर संस्थांकडून नामांकन मागविण्यात येतात,त्यातून उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्थांची निवड केली जाते.मात्र 2014 पासून हे पुरस्कार देण्याचे प्रलंबित होते.पाणी वापर संस्थांनी अनेक वेळा मागणी करून ही हे पुरस्कार देण्यास टाळाटाळ होत होती.
राज्याचे जलसंपदा मंत्री जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे 30 सप्टेंबर 2021 रोजी नेवासा तालुका दौऱ्यावर आले असता पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्ते जलमित्र सुखदेव फुलारी यांनी ना.पाटील यांचेकडे पाणी वापर संस्थांच्या व्यथा मांडून राज्यातील पाणी वापर संस्था सक्षमीकरण करणे बाबद व 2014 पासून प्रलंबित असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्काराचे तातडीने वितरीत करावे या मागणीचे निवेदन दिले होते.
ना.पाटील यांनी निवेदन स्वीकारून ज्या पाणी वापर संस्थांनी चांगले काम केले त्यांचा सन्मान करू,पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार विरतरण करणे बाबद निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते.त्याची पूर्तता झाली असून जलसंपदा विभागाने हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
*सन2014-15 चे राज्यस्तरीय पुरस्कार*
कृषी देवता पा.वा.संस्था पुनवडी, ता.बारामती,पुणे प्रदेश(प्रथम क्रमांक 7 लाख रुपये),संत कदम माऊली पाणी वापर संस्था,पाथरे,ता. राहूरी (द्वितीय क्रमांक 5 लाख रुपये), बागाईतदार पा.वा.संस्था,आराई,बागलाण(तृतीय क्रमांक 3 लाख रुपये).
*प्रदेशस्तरीय पुरस्कार*
*नाशिक प्रदेश:- जय बजरंग पा.वा.संस्था,जामोरी,ता. दिंडोरी
(प्रथम क्रमांक 3 लाख रुपये), श्री समर्थ पा.वा.संस्था, मोहाडी,ता.दिंडोरी (द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये).
*पुणे प्रदेश:-श्री गुरुनाथ पा.वा.संस्था, वडनेर, ता.शिरुर,पुणे (प्रथम क्रमांक 3 लाख रुपये),श्री खांडेश्वरी पा.वा.स. खांडज,ता. बारामती(द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये).
*अमरावती प्रदेश:-अंब्राजीबाबा पा.वा.संस्था,परसापूर,ता. अचलपूर (प्रथम क्रमांक 3 लाख रुपये), जय किसान पा.वा. संस्था, परसापूर, ता.अचलपूर (द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये).
*नागपूर प्रदेश:- गजानन पा.वा.संस्था,
बोनडगांव,ता.अर्जुनी,गोंदिया(प्रथम क्रमांक 3 लाख रुपये),माँ गंगा पा.वा.संस्था, अरततोंडी, ता.अर्जुनी,गोंदिया(द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये).
*औरंगाबाद प्रदेश:- जलस्वराज्य पा.वा.संस्था,बारड,ता.मुखेड,जि.नांदेड
(प्रथम क्रमांक 3 लाख रुपये), मुक्तागिरी पा.वा.संस्था, देळूब बुद्रुक,ता.अर्धापुर,नांदेड(द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये).
*कोकण प्रदेश:- गंगेश्वर पा.वा.संस्था, शिरगांव,ता.देवगड,सिंधुदुर्ग(प्रथम क्रमांक 3 लाख रुपये),लिंगेश्वर पा.वा.संस्था,निळेली,ता.कुडाळ, सिंधुदुर्ग(द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये).
*सन 2017-18 चे राज्यस्तरीय पुरस्कार*
जानुबाई पा.वा.संस्था, बारामती(प्रथम क्रमांक 5 लाख रुपये),ज्योतिर्लिंग पा.वा.संस्था, बारामती, पुणे(द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये), वारेगाव ग्रुप उपसा जलसिंचन सहकारी संस्था, सिन्नर,जि. नाशिक (तृतीय क्रमांक 1 लाख रुपये)
*कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गट:- पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था संघ,ता.मेहकर, जि. बुलढाणा (प्रथम क्रमांक 5 लाख रुपये)
*सन 2018-19 चे राज्यस्तरीय पुरस्कार..*
केशवराज पाणी वापर संस्था, अन्वि मिरझापुर,ता.अकोला (प्रथम क्रमांक 5 लाख रुपये)
*मध्यम प्रकल्प गट:- कै. रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्था, वलखेड,ता.दिंडोरी,जि. नाशिक (प्रथम क्रमांक 5 लाख रुपये).
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
*या पुरस्काराने पाणी वापर संस्थांना उभारी मिळेल-फुलारी*
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 मुळे पाणी वापर संस्थांचे महत्व
वाढलेले आहे. प्रकल्प ते लघुवितरका-शेतकऱ्याचे बांधपर्यंत समन्यायी पाणी वाटप होण्याचे दृष्टीने शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा हा या मागील हेतू आहे.2005 च्या कायद्याने पाणी वापर संस्थांना हंगाम निहाय लागणाऱ्या पाण्याची लेखी हमी शासनाकडून दिली जाते.त्याच बरोबर शासनाला भरण्यात आलेल्या पाणीपट्टी मधून 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा पाणी वापर संस्था दिला जातो.पाणी मिळण्याची 100 टक्के हमी या कायद्याने दिली हे खूप महत्वाचे आहे.
त्यामुळे भविष्यात पाणी वापर संस्था अधिक बळकट व्हाव्यात यासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाने संस्थांमध्ये पुरस्कार रुपी स्पर्धा ठेवलेली आहे.चांगल्या पाणी वापर संस्थांचा गौरव झाला तर त्यांचा आदर्श घेऊन इतर संस्था ही सक्षम होतील हा यामागचा हेतू आहे. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आमची मागणी मान्य करून 2014 पासून प्रलंबित असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार पुन्हा सुरू केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
–जलमित्र सुखदेव फुलारी
प्रवीण प्रशिक्षक,पाणी वापर संस्था