Sunday, June 4, 2023

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वृक्ष-संवर्धन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वृक्ष-संवर्धन

सुखदेव फुलारी/अहमदनगर

भारतीय संस्कृतीच्या विकासात संत-महापुरुषांचे मोठे योगदान आहे. मानवी जीवनमुल्यात जगण्याचा आदर्श असावा, त्यासोबतच निसर्गाचे संगोपन हे मानवी जीवनावर मोठा प्रभाव करीत असते.त्यामुळेच मानव सुखी, आनंदी, आरोग्यदायी राहू शकतो,हे प्रत्येक संताने आपल्या साहित्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण मानवाच्या स्वार्थी बुद्धीने संत-महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांना मात्र पोथीत बंदिस्त केले. विचारांची पूजा न करता ग्रंथांवर फुले वाहण्यातच त्याने धन्यता मानली.

विसाव्या शतकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या समाजसुधारक संताने ‘ग्रामगीता’ नावाच्या ग्रंथातून समाजजीवन आणि निसर्ग यांचा मानवी जीवनावर कसा प्रभाव होतो, पर्यावरण जपणे कसे महत्त्वाचे आहे, याची मांडणी केली.ग्रामगीतेत विविध विषयांवर चर्चा करताना ‘वृक्षसंवर्धन करणे हे मानवी जीवनाचे मूलभूत अंग आहे. त्यापासून मानव दूर गेला म्हणूनच आज नैसर्गिक आपत्तीतून मानव संहार मोठय़ा प्रमाणात होत आहे. सारे जग आज यावर चिंतेत आहे. त्यावर संतांनी मात्र शेकडो वर्षाआधीच कथन करून ठेवले आहे’ याकडे लक्ष वेधले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात ‘सेवासार्मथ्य’ या अध्यायात लिहितात-

‘वृक्ष सर्वांची सेवा करितो। छाया, पुष्पे, फळे देतो।
शेवटी प्राण तोही कार्या लावितो। सेवेसाठी।।90।।.

मानवाने सेवेचे महत्त्व वृक्षांकडून समजून घ्यावे असे राष्ट्रसंत तुकजोडी महाराज म्हणतात. वृक्ष, फळे, फुले देऊन मानवी समुहावरच नाही तर पशुप्राण्यांवर परोपकार करीत असतात. हा परोपकार आपण वृक्षावर करतो का? त्यांचं संगोपन करतो का? यासारखे प्रश्न ते विचारतात. त्याहीपुढे जाऊन ग्रामगीतेतील ‘गोवंश-सुधार’ अध्यायात ते सांगतात-

वनस्पती आदींचा सहवास। सुर्य किरणातील सत्वांश।
शुद्ध हवेतील र्शम सर्वास। अमृतापरी लाभदायी।।90।।

मानवी जीवनात अमृतासारखे लाभदायी आयुष्य वनस्पती सहवासाने मिळते. सूर्य किरणातील सत्वांश वनस्पती शोषते. त्यातून शुद्ध हवा निर्माण होऊन चांगले आरोग्य मानवाला मिळते अशी त्यांची भूमिका आहे. त्यापुढे चांगल्या आरोग्यासाठी वनस्पतींचे महत्त्व कसे आहे, हे सांगताना ते ग्रामगीतेत लिहितात.-

मग गाव असो की शहर। तेथे रोगांचा न राहे संचार।
एक -एक व्यक्ति करील आचार। ऐसा जरि।।88।।

वनस्पतीच्या सहवासाने शहरातील आणि खेड्यामधील सर्वच माणसे निरोगी राहू शकतात. याची ग्वाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या श्लोकातून दिली आहे.फक्त वृक्षारोपण केल्यानेच निसर्ग संतुलन होत असते असे नाही तर उत्तम चारा गुरांढोरांना मिळावा म्हणून सार्वजनिक गवताची माळरानं असावीत, त्यांची शासनाने अथवा जमीनदारांनी आपल्या पडीत जमिनी गावाला दान देऊन गोवंश सुधारास मदत करावी असे ते म्हणतात-

गायीला नसे चराऊ जमीन। तरि मोकळी पाडावी सरकारकडोन।
अथवा गावी करावी अर्पण। जमीनदारांनी।।50।।

चारा पाणी अति महाग। नाही व्यवस्थेसाठी मार्ग।
मानवचि अर्थपोटी, मग। गायी कशा पाळाव्या?

कृषी संस्कृतीत गाय हा महत्त्वाचा प्राणी आहे. त्याच्या संगोपनाचा पर्यावरणाशी संबंध आहे असे राष्ट्रसंत सांगतात. अनेकदा वृक्षांची कत्तल माणूस गुरा-ढोरांच्या चार्‍यासाठी करतात. यामुळे पर्यावरण संतुलनात बिघाड होतो. गावातल्या प्रत्येक कुटुंबाचे योगदान कसे पर्यावरण रक्षणात असू शकते हे सांगताना ते म्हणतात,

सूर्य किरणांनी तयार झाली। कंद, भाज्या, फळं बागेत पिकली।
सत्वांशयुक्त सर्व तो भली। आरोग्यदायी।।106।।

सर्व वने-राने जागी होती। पुष्पे सारी विकास पावती।
पशुपक्षीही नेहमी उठती। प्रात:काली।।42।।

आज वृक्ष नष्ट झाले. पक्षांची घरटी गेली. त्यांचा सुमघुर चिव-चिवाट गेला. मानवी मन प्रसन्नतेला मुकले. आज मानवी जीवनाची पहाट वृक्ष-वल्लीचं, पशु-पक्ष्यांचं सान्निध्य गमावल्यामुळे निरुत्साही होत आहे.

एक असावा सुंदर बाग। त्यात मन: स्वास्थाचेचि असावे अंग।
प्रसन्नता वाढावी नानारंग। वृक्ष, वेली, लताकुंज ।।97।।

झाडे दिसती ओळीत बद्ध। सरळ, सुंदर, हिरवी शुद्ध।
घर मालकचि करी खुद्द। काय आपुल्या हातांनी।।42।।

बगीचा म्हणजेच वृक्षांचा समुह. हा नेहमी मानवी जीवनात प्रसन्नता वाढवतो. फुलांचे, वेलींचे नानारंग प्रसन्न मनाला मोडून टाकतात. आपल्या समोरच्या रस्त्याच्या कडेला वृक्ष लावा, त्यांचे संगोपन, घरमालकांनी करावे म्हणजेच सर्व कुटुंबाला वृक्ष संगोपनाचे महत्त्व कळेल असे राष्ट्रसंतांना वाटते.

घराभोवती बाग केली। सांड पाण्यावरी झाडे वाढली।
फळा, फुलांची रोपे वेली। भाजीपाला नित्याचा।।43।।

‘ग्रामनिर्माण कला’ या ग्रामगीतेतील अध्यायात राष्ट्रसंत म्हणतात,’नुसतीच मोठी झाडे लावणे म्हणजे पर्यावरण रक्षण नाही तर परसबागही पर्यावरणाला मदत करते. सांडपाण्याचा उपयोग परसबागेला फुलवण्यासाठी होतो. त्यामुळे ग्रामआरोग्य पण चांगले राहते. सात्विक फळभाज्या आहारात मिळतात. रंगीबेरंगी फुलपाखरे आता दिसतच नाहीत. पंचेवीसतीस वर्षाआधी गाव खेड्यातून आणि शहरातून दिसायची. आजच्या पिढीला फुलपाखरांचा आनंदच माहित नाही.

आज भारतात कुपोषणाची मोठी समस्या आहे. गाव खेड्यातून सात्विक अन्न मिळत नसल्यामुळे तरुण मुले कुपोषित दिसतात. याला जबाबदार आजची वृक्षतोड आहे. कारण आधी विविध ऋतुत विविध रानफळे लोकांना खायला मिळायची. आज रासायनिक प्रक्रियेतून पिकणारी फळे आमच्या आहारात पोहचली. चिंचा, कवठ, येरोण्या, करवंद, चार, शिरण्या, आवळा, टेंभर, मोहपुले, चिचचिलाई विविध भागातील वेगळा रानमेवा पर्यावरणातून मिळायचा. जो रासायनिक प्रक्रियेतून आजही वाचलेला आहे. त्या वृक्षांची लागवड पर्यावरणाला म्हणजेच पशु-पक्षांना पण मानवासोबतच अन्न उपलब्ध करून देतात. जंगलातील श्‍वापद, पशुपक्षी, छोटे प्राणी, अन्नाच्या शोधात गावात येणार नाहीत तसेच औषधी वनस्पती लावा.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्वाणानंतर त्यांचे मृत्यूपत्रांमध्ये त्यांच्या  इच्छेनुसार त्या ठिकाणी पाच वृक्ष लावावेत,असे म्हटले होते. वड, पिंपळ, औदुंबर, आवळा आणि बेलाचे. आजही त्या ठिकाणी हे वृक्ष आहेत. हे वृक्ष आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे आहेत. तसेच मानवी जीवनासोबतच पशु-पक्षांच्या आश्रयाचे आणि अन्नाचे ते रक्षक आहे. तुकडोजी महाराज यांनी फार मोठा विचार केला आहे.
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज ११४वी जयंती*
विनम्र अभिवादन
(साभार-मछिंद्र ऐनापुरे)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!