माय महाराष्ट्र न्यूज:देशाच्या आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या ॲप्स विरोधातील सरकारची नेटाची भूमिका कायम आहे. 2020 पासून भारतात आधीच बंदी घातलेल्या ॲप्सच्या क्लोनचा सध्या बंदी (apps clone ban) घालण्यात
आलेल्या यादीत समावेश आहे. सरकारने 50 ॲप्सवर वक्रदृष्टी फिरवल्याने बंदी घातलेल्या ॲप्सची संख्या 320 वर पोहचली आहे.भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला (security, integrity) धोका असल्याचं कारण देत हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
2020 पासून एकूण 270 ॲप्सवर बंदी घातल्यानंतर 2022 मध्ये सरकारने पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उगारला आहे. न्यूज 18 ने ईटी नाऊच्या रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, सरकारने आणखी 50 ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्सवर
आयटी कायद्याच्या (IT Act) कलम ६९ अ अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, गॅरेना फ्री फायर नावाचा लोकप्रिय स्मार्टफोन गेम याआधी गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप्स स्टोअरमधून गायब झाला होता आणि भारतात बंदी
घातलेल्या ॲप्सच्या नव्या यादीत या गेमचा समावेश होऊ शकतो, असं समोर येत आहे.या अहवालानुसार, बंदी घातलेल्या ॲप्सच्या नव्या यादीत 2020 पासून भारतात आधीच बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सच्या क्लोनचा समावेश आहे.
आणखी 50 बंदी घातलेल्या ॲप्समुळे भारताने बंदी घातलेल्या एकूण ॲप्सची यादी 320 च्या जवळपास पोहचली आहे.2020 मध्ये लडाखमध्ये सीमारेषेवरवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता, तेव्हा टिकटॉकसह 59 चिनी
ॲप्सवर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती. टिकटॉक, यूसी ब्राऊझर, शेअर इट, हेलो, लाइकी, वी चॅट, ब्युटी प्लस या लोकप्रिय ॲप्सवर भारताने बंदी घातली होती. यानंतर सरकारने 47 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली, त्यातील बहुतांश ॲप्स
एकतर आधीपासून बंदी घातलेल्या ॲप्सचे क्लोन होते अथवा त्यांच्यासारखे होते. यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये भारताने पबजी या लोकप्रिय गेमिंग ॲप्सह आणखी 118 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली.
पबजी व्यतिरिक्त लायविक, वीचॅट वर्क, वीचॅट रीडिंग, कॅरम फ्रेंड्स, कॅमकार्ड यासारख्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती.