माय महाराष्ट्र न्यूज:जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना ‘उडविण्याची’ भाषा करणारी ऑडिओ क्लिप रविवारी व्हायरल झाली आहे.
या व्हायरल क्लिपसंदर्भात अद्याप पोलिसांत तक्रार झाली नसली तरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून
याबाबत अहवाल मागविला आहे.मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर तालुक्यातील लोहगाव शिवारात शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी 5 फायर केले होते.
त्यातील दोन गोळ्या राजळेंच्या शरिरात घुसल्या होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच रविवारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये मंत्री
गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांना जीवे मारण्याविषयी उल्लेख आहे.यासाठी 21 विदेशी बनावटीच्या पिस्तुल आणल्याचा दावा या क्लिपमधील संवादात करण्यात आला आहे. राजळे यांच्यावर
जीवघेणा गोळीबार झाल्यानंतर ही क्लिप समोर आल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. दरम्यान, या व्हायरल क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र मंत्री
गडाख आणि त्यांच्या कुटुंबाचा ज्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला त्यावरून हा व्यक्ती त्याच परिसरातील असावा, असा अंदाज आहे.