माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे.
एककीडे राजकीय चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे मात्र राजकारणातील प्रस्थापित चेहरे संस्थानरवर आल्यास सर्वसामान्य व भाविकांमध्ये रोष तयार होवू शकतो, अशीच परिस्थिती आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आहे. सिद्धीविनायक देवस्थानचे अध्यक्षपद सेनेकडे असल्याने साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहे.
राष्ट्रवादीकडून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. स्थानिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती माहिती असणे ही काळे यांची जमेची बाजू आहे.आमदार रोहित पवार यांच्याही नावाची चर्चा असून पवार संस्थानसाठी नवखे आहेत. मात्र त्यांना मोठे राजकीय पाठबळ आहे.
याशिवाय कोविडमध्ये उल्लेखनीय काम करणारे आमदार निलेश लंके यांच्या नावासाठी जनतेतून होणारी मागणी ही लंकेची जमेची बाजू आहे. सामान्य कुटूंबातील असलेल्या लंके यांना मात्र अध्यक्ष होण्यासाठी पुरेसे राजकीय पाठबळ नाही.
काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. स्थानिक परिस्थितीची जाण असली तरी ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक असल्याने एकाच कुटूंबात अनेक पदे देतांना विचार होवू शकतो.
श्रद्धा व विकासाची सांगड घालणारा, भक्तांच्या समस्या जाणून घेणारा, शिर्डीचे आंतराष्ट्रीय महत्व वृद्धींगत करतांनाच सामाजिक दृष्टीकोण असणारा अध्यक्ष साईसंस्थानला मिळावा अशी भाविकांची सदैव अपेक्षा असते.