माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील साईनगर येथे गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारून तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून अक्षय खरात व शिवा सातपुते यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत १९ वर्षीय महिला तिच्या पतीसह साईनगर परिसरात भाड्याच्या घरात राहते. या दांपत्यांचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. महिला सहा महिन्याची गरोदर आहे.
सोमवारी दिनांक ७ रोजी महिला बाथरूममध्ये गेली त्यावेळी बाथरूमच्या खिडकीतून कोणीतरी डोकावत असल्याचे तिने पाहिले. डोकावणारी ही व्यक्ती गल्लीतील अक्षय खरात हा होता. महिला बाथरूममधून बाहेर येत असताना खरात तेथून पळून गेला. हा प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी
सहा वाजेच्या सुमारास खरात व सातपुते हे दोघे महिला राहत असलेल्या ठिकाणी गेले. तु माझे नाव का घेतेस असे खरात हा त्या महिलेला म्हणाला. त्यनंतर तिच्या पोटात त्याने लाथ मारली. महिलेचा पती सोडविण्यासाठी आले असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निकिता महाले हे करीत आहे.